ठाकरे गट भाकरी फिरवणार ; बीएमसी निवडणुकीत’ या ‘ इच्छुकांचा पत्ता कट होणार? उमेदवारी कोणाला?

पुणे: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. अशातच ठाकरेंनी आता उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट मनसेसोबत युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे गटांने जोरदार कंबर कसली आहे. ठाकरे गटाने भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.२०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेसमोर आता नव्या उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक बांधणी यावर भर दिला जात आहे.त्यानुसार पक्षातील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखत, त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार या निर्णयामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या यादीत किमान ७० टक्के उमेदवार नवे चेहरे असतील. यामुळे तरुण शिवसैनिकांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.मात्र दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या सत्तेतून शिवसेना ठाकरे गटाचं अस्तित्व संपवण्यासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट जोरदार प्रयत्नशील आहे.

