कर्जमाफी करा पण श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला…

नागपूर : सध्या सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन सुरु आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी देखील याठिकाणी भेट देत पाठिंबा दिला. सध्या आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाला आहे.

सध्या बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शविला आहे. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील.

यामुळे यामध्ये काय तोडगा निघणार हे लवकरच समजेल. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी असावी यासंदर्भात बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ज्यांची सरकारी नोकरी आहे, पेन्शन आहे, ज्यांनी फक्त गुंतवणूक करण्यासाठी, टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतली आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये.

सरकारने गरजवंत शेतकरी लवकरात लवकर शोधावे आणि त्यांना कर्जमाफी द्यावी, अशी अपेक्षाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली. डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाची खरी आर्थिक स्थिती शोधणे सरकारला आता सोपे झाले आहे. यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, बैठकीनंतर तोडगा निघाला नाही तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. आजच्या बैठकीत कर्जमाफी, पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंदे, 20 टक्के बोनस , हमीभाव याबाबत चर्चा होईल, असेही ते म्हणाले.
