दोघांनी थंड डोक्याने मिळून नकुल भोईरचा काटा काढला! आता प्रकरण वेगळ्या वळणावर…

पुणे : पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. सुरुवातीला मयत नकुल भोईर यांच्या पत्नी चैतालीनेच नकुल यांचा गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली होती.

मात्र, नकुल यांचा खून करताना तिच्यासोबत तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार हा देखील सोबत होता आणि दोघांनी मिळून कट रचून नकुल यांचा निर्घृणपणे खून केल्याचं तपासात समोर आलं आहे.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून, तपासादरम्यान मिळालेल्या CCTV फुटेजने संपूर्ण खेळच पलटवला आहे. घटनास्थळी सिद्धार्थ पवार उपस्थित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

तसेच नकुल भोईर यांना पत्नी चैतालीचे सिद्धार्थसोबतचे अनैतिक संबंध कळल्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. घटनेच्या दिवशीदेखील दोघांमध्ये तीव्र वाद झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नकुलवर चैतालीने रागाच्या भरात कापडाने गळा आवळायला सुरुवात केली. नकुल जीवाच्या आकांताने तडफडत असताना, तिथेच उपस्थित असलेल्या सिद्धार्थनेही चैतालीची साथ दिली आणि ओढणीचं दुसरं टोक आवळत नकुलचा श्वास रोखला.
दरम्यान, या घटनेनंतर चैतालीने सिद्धार्थला तिथून निघून जाण्यास सांगितले आणि गुन्ह्याची जबाबदारी स्वतःवर घेत पोलिसांना फोन केला. मात्र घटनास्थळी पोलिस पोचल्यावर त्यांना तफावत आढळली. तिथे तीन व्यक्तींनी दारू प्यायल्याचे पुरावे मिळाल्याने पोलिसांनी संशय घेत चौकशीचा तपास अधिक तीव्र केला.
पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासल्यावर सिद्धार्थ पवार घटनास्थळी आला आणि परत गेला यातील वेळ आणि त्याच्या जबाबात दिलेल्या वेळेत विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांनी त्याला कसून चौकशीसाठी ताब्यात घेतले. अखेर दबावाखाली सिद्धार्थने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की, चैतालीसोबत मिळून त्यांनी नकुलचा खून केला.
