पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; जेष्ठ दाम्पत्याला तब्बल सव्वा कोटींना लुटलं, काय आहे प्रकरण?

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात सायबर फसवणुकीच्या घटना वारंवार समोर येत असतानाच आता ज्येष्ठ दाम्पत्याला सायबर चोरट्यांनी तीन दिवस डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून १ कोटी १९ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ नागरिकांचा धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,तक्रारदार टिंगरेनगर येथील एका सोसायटीत राहतात. त्यांच्या तीन मुली अमेरिकेत असतात. तक्रारदारांच्या पतीला १६ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी फोन करून कुलाबा पोलिस ठाण्यातून आयपीएस अधिकारी बोलत असल्याच खोटं सांगितल.विमान कंपनीशी संबंधित मोठ्या आर्थिक गैरव्यवहार आणि अनैतिक मानवी तस्करीसाठी तक्रारदारांच्या पतीच्या बँक खात्याचा वापर झाल्याचा खोटा बनाव रचून चोरट्यांनी तक्रारदारांच्या मोबाइलवर गुन्ह्याची नोटीस पाठवली. तसेच तक्रारदाराला प्रत्यक्ष ‘डिजिटली’ अटक करण्याचे पर्याय दिले. या प्रकारामुळे तक्रारदार व त्यांचे पती घाबरून गेले. त्यानंतर चोरट्यांनी या दाम्पत्याला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करून व्हिडिओ कॉल करून तीन दिवस कॅमेऱ्यासमोर बसवून ठेवले तसेच पडताळणीच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी एक कोटी १९ लाख रुपये बँक खात्यांवर पाठविण्यास सांगितले.

दरम्यान तक्रारदाराच्या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सायबर चोरट्यांविरोधात फसवणूक, तोतयेगिरी, सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक या भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे सायबर पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

