स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच पक्षांतराच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

धाराशिव जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे आणि अमर सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीची वाट धरली होती. याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला बसला होता.

दरम्यान, आता स्थानिक निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, केवळ महाविकास आघाडीतूनच नव्हे, तर महायुतीमधील मित्रपक्षांमधूनही (शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट) भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याचे चित्र आहे. यावरून खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
