ऐन दिवाळीत धुंवाधार पाऊस, पुढील ७२ तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी…

पुणे : महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हवामानात बदल होताना दिसत आहे. पुढील तीन दिवस पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील हवामानातील अस्थिरतेमुळे पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे. या परतीच्या पावसामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव येत होता, मात्र मागील २४ तासांत वातावरण ढगाळ झाले असून, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात अनेक भागात पावसाची उघडझाप सुरू झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच २३ ऑक्टोबर रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाडा-विदर्भातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसह खान्देशातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आला आहे. तर २५ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव या भागात पावसाचा जोर कायम राहील.
दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांवर या अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो. विशेषतः सोयाबीन, कापूस आणि तुर पिकांवर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
