मावळच्या राजकारणात ट्विस्ट: राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके अन बाळा भेगडे एकाच मंचावर, मामा-भाचे एकत्र येणार?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मावळच्या राजकारणात राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजप नेते बाळा भेगडे एका मंचावर एकत्र आले आहेत.या ऐतिहासिक भेटीमुळे राजकीय वर्तुळात ‘मामा-भाचा’ पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आले आहे.

मावळ तालुक्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे एकत्र आले आहेत.’मावळच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजकारण वेगळं असलं, तरी विकासाच्या कामात आपण सर्व एक टीम म्हणून काम करू शकतो. बाळा भेगडे यांनी फक्त सहकार्याची टाळी दिली, तर मावळचा विकास अधिक वेगाने साधता येईल. मी मावळच्या विकासासाठी राजकारण विसरून हात पुढे केला आहे. असं सुनील शेळके यावेळी बोलताना म्हणाले आहेत.शेळके यांच्या या वक्तव्याला भेगडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत भेगडे यांनी महायुतीच्या भूमिकेविरुद्ध जाऊन सुनील शेळके यांच्याविरोधात प्रचार केला होता. अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या प्रचारात बाळा भेगडे हे सक्रियपणे सहभागी झाले होते. त्यामुळे दोघांमधील दुरावा अधिक वाढला होता. मात्र, आता दोघांच्या संवादातून तो तणाव ओसरताना दिसत असून मामा-भाचे एकत्र येणार का? या चर्चा सुरू झाल्या आहेत.या भेटीनंतर मावळच्या राजकारणात नवा सूर उमटल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘मामा-भाचा’ ही जोडी पुन्हा एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक राजकीय समीकरणात मोठा ट्विस्ट येण्याचे चिन्हे दिसत आहेत.

