पुण्यात वातावरण तापलं ; ‘कितीही कट कारस्थाने करा, मागे हटणार नाही’, हकालपट्टीच्या चर्चेदरम्यान रवींद्र धंगेकरांच्या पोस्टने खळबळ

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुण्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी महायुतीलमधील बड्या नेत्यांवर आरोप केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळेच त्यांची शिवसेनेतील हकालपट्टी करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.या हकालपट्टीच्या चर्चेदरम्यान रवींद्र धंगेकरांनी ‘कितीही कट कारस्थाने झाली तरी मागे हटणार नाही’ अशी पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या पोस्टमधून त्यांनी तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवींद्र धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..! अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी करणार असल्याच्या चर्चेदरम्यान धंगेकरांची पोस्टही चांगलीच चर्चेत आली आहे. याशिवाय आणखी एक पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्टमधून माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण पोस्टमधून कोणाचे नाव न घेता ती व्यक्ती कोण आहे, हे फडणवीस साहेबांना माहित असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असा कानमंत्र धंगेकरांना दिला होता. मात्र, रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम असून पुणेकरांसाठी लढत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. अशातच आता रवींद्र धंगेकरांनी एक पोस्ट एक्सवरून शेअर करत सूचक संदेश दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

