हवेलीत भाजप व राष्ट्रवादी सत्ताधारीच आमनेसामने होणार! जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या खुल्या आरक्षणाने रंगत वाढणार…

जयदिप जाधव उरुळीकांचन : पुणे जिल्हा परिषदेच्या तीन वर्षांच्या प्रदिर्घ प्रशासकीय राजवटीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या
आरक्षण सोडत कार्यक्रमानंतर हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षांत हालचाली गतिमान झाल्या असून जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या अनेक वर्षांच्या सारीपाटात संख्याबळाने सत्तेचा मुख्य मार्ग असलेल्या हवेली तालुक्यात जिल्हा परिषद गटांची संख्या कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण अध्यक्षपदाच्या शर्यतीत निराशा झाली आहे.मात्र हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची जागा खुली झाल्याने तालुक्यात सत्ताधारी पक्षात स्पर्धा तीव्र झाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात शहरालगतचा तालुका असल्याने लोकसंख्येच्या आधाराने हवेली तालुक्याची जिल्हा परिषदेची गट संख्या सर्वाधिक असलेल्या तालुक्याने पुणे जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या अजित पवार यांच्या प्रभावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहिल्या आहेत. उपनगरातील भाग हा राष्ट्रवादीच्या बलाढ्य ताकदीच्या जोरावर राष्ट्रवादीकडे राहिला आहे. मात्र आता भाजपने शहर तसेच उपनगर भागात आपले अस्तित्व प्रस्तापित केल्याने हवेली तालुक्यात ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती गटात चुरस वाढली आहे. अशातच दोन्ही महत्वाचा पदांची आरक्षणे खुल्या प्रवर्गास झाल्याने सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी गटात हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक अधिनियम २०२५ नुसार यंदाची निवडणूक चक्राकार आरक्षण पध्दती झाल्याने या नव्याने काढण्यात आलेल्या सोडतीने हवेली तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीच्या उर्वरीत कार्यक्षेत्रात ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती गणांत निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत हवेली तालुक्यातील दोन्ही सहकारी संस्था असलेल्या पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखाना या महत्त्वाच्या संस्थांवर संचालक मंडळाची वर्णी लागल्याने काही प्रमाणात इच्छुकांची संख्या कमी झाली आहे.

मात्र यंदाच्या निवडणुकीत ‘आमदारकीची’ मनिषा बाळगून तयार असलेले अनेक मान्यवर मिनी विधानसभेची तयारी म्हणून निवडणुकीकडे बघू लागल्याने तसेच जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीवर सत्ता काबीज करण्यासाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीतच स्पर्धा सुरू झाल्याने प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांत लढत तीव्र होणार आहे. हवेलीतून गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य झालेले ज्ञानेश्वर कटके यांची विधानसभेत दणदणीत वर्णी लागल्याने हवेली तालुक्यात या पदांसाठी मोठी प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.
पर्यटन व देवदर्शन वाढले….
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांनी मतदारांना प्रलोभित करण्यासाठी पर्यटन सहली तसेच देवदर्शन सहलींची खास मेजवानी ठेवली आहे. अगदी आयोध्या , बनारस, उज्जैन तसेच राज्यातील तुळजापूर, अक्कलकोट अशा सहली सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे या तालेवार इच्छुकांकडे मतदारही आपली हौस भागवून घेण्याचा तयारीत असून तालेवार उमेदवार मतदार हेरून शोधत आहे.
