पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अश्विनी जाधव कालवश ; निधनाचं कारण अस्पष्ट….

पुणे : पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आश्विनी जाधव यांचे अकस्मात निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.डॉ. जाधव या पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात कार्यरत होत्या. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी फेसबुकच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. जवळची मैत्रीण गेल्याबद्दल त्यांनी समाजमाध्यमांतून हळहळ व्यक्त केली आहे.

वंदना चव्हाण यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

माझी प्रिय अश्विनी… तू गेलीस यावर विश्वास बसत नाहीये… माझं मन मानायला तयार नाहीये… मला होणारे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत… प्रिय मैत्रिणी, हे तुझ्यासोबत कसे घडू शकते ? अशा आशयाची पोस्ट खासदार वंदना चव्हाण यांनी फेसबुकवर लिहिली आहे.

अश्विनी कदम आठवणींनी व्याकूळ
दरम्यान, पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी नितीन कदम यांनीही मैत्रिणीच्या आठवणीत भावना समाज माध्यमांवरुन व्यक्त केल्या आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिताना म्हटलं आहे, की “भावपूर्ण श्रद्धांजली.. अतिशय दुःखद बातमी… मन हेलावून टाकणारी घटना… माझी जिवलग मैत्रीण, सहकार्यशील आणि समाजासाठी झटणारी डॉ. आश्विनी ताई जाधव आता आपल्या मध्ये नाहीत, हे शब्द उच्चारतानाच मन सुन्न होतंय…”
