थ्री इडियट्सची पुनरावृत्ती!! धावत्या लोकलमध्ये तरुणाने केली महिलेची प्रसूती, रोहित पवारांनी केलं तरुणाचे कौतुक…

मुंबई : मुंबई मध्ये एका गर्भवती महिलेला लोकलमध्ये वेदना सुरू झाल्या. यावेळी विकास नावाच्या तरुणाने डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला विडिओ कॉल करून यशस्वीपणे प्रसूती केली. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यामुळे थ्री इडियट्स या चित्रपटाची आठवण झाली. आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं.

जवळ कुणी डॉक्टर नव्हता आणि संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सही उपलब्ध होत नव्हती. परंतु प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची अवस्था न पहावल्याने विकासने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे प्रसूती केली.

त्याने वेदनांमधून त्या आईची सुटका केली. इथं जात-धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. या कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन! असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्याचे कौतुक केले आहे.
