यावर्षी दिवाळी साजरी करणार नाही! पवार कुटुंबियांचा निर्णय, कारणही आलं समोर…

बारामती : दिवाळी निमित्त बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दरवर्षी शरद पवार आणि पवार कुटुंब एकत्र येत दिवाळी साजरी करत असत. यावेळी राज्यातून अनेक लोकं भेटीसाठी येत असतात. यावर्षी मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याठिकाणी कोणी येणार नाही.

त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा. असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अजित पवार हे यावेळी काटेवाडीत हा कार्यक्रम घेणार का? याबाबत अजून माहिती समोर आली नाही. गेल्यावेळी त्यांनी वेगळा पाडवा साजरा केला होता. पवार कुटूंबात फूट पडल्यापासून सध्या हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
