मोठी बातमी! ‘या’ विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आझाद मैदानावर आंदोलन

पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या अंगणवाडी सेविका आता आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.निवृत्तिवेतन, उपदान (ग्रॅच्युईटी), प्रोत्साहन भत्ता, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तिवेतन व उपदान मिळावे यासाठी १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
काही महिन्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये व मतदनीस यांना दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने आदेश दिले आहेत. त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर ॲपवर आपल्या कामाची नोंद करणे बंधनकारक केले आहे.मात्र या पोषण ट्रॅकर ॲपवर काम करून सुध्दा प्रोत्साहन भत्त्याची रक्कम त्यांना देण्यात आलेली नाही. तसेच मातृवंदना योजना कामाची सक्ती असल्याकारणाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामात अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे मुख्यसेविका व पर्यवेक्षिका यांच्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी मदतनीसांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चे अर्ज भरले असून त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्तिवेतन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपदान (ग्रॅच्यूईटी) देण्याच्या प्रस्तावावर सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या या उदासिनतेमुळे अंगणवाडी कर्मचारी हतबल झाले आहेत.
या राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बृजपाल सिंह, कॉ. शुभा शमीम, कॉ. दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, कॉ. जीवन सुरुडे, जयश्री पाटील, कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.