फरार गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात! आणखी एक गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?

पुणे : शहरातील कोथरुड येथे गेल्या महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ गँग चांगलीच चर्चेत आली, तर गुंड निलेश घायवळच्याही मागे पोलिसांचा ससेमिरा लागलाय. मात्र, असे असताना आता निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे.
कोथरुडमधील मोबाईल दुकानदाराला धमकाऊन त्याच्या नावावर सीम कार्ड घेतल्याचे प्रकरण समोर आलं आहे. निलेश घायवळवर नावाने सिमकार्ड वापरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे निलेश घायवळ याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या २५ दिवसात निलेश घायवळ याच्यावर तब्बल ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिवाय त्या सीम कार्डचा उपयोग घायवळने वेगवेगळ्या बँकमधे अकाउंट्स उघडण्यासाठी आणि केवायसीसाठी केला. १३ जानेवारी २०२० ला निलेश घायवळने पुण्याच्या कोथरुड भागातील डहाणूकर कॉलनीतील एका मोबाईल दुकानदाराकडे व्हीआयपी मोबाईल नंबरची मागणी केली. हा नंबर घायवळला त्या दुकानदाराच्या नावावर हवा होता.
दरम्यान, दुकानदाराने सुरूवातीला नकार दिल्यानंतर घायवळने त्या दुकानदाराला शिवीगाळ करुन धमकावले. त्यानंतर दुकानदाराने त्याचे आधारकार्ड वापरुन मीळलेले सीमकार्ड घायवळला दीले. त्या सीमकार्ड आणि मोबाईल नंबरचा उपयोग करुन घायवळने स्वतःच्या नावाने आणि पृथ्वीराज एंटरप्रायजेस आणि समृध्दी एग्रो या कंपन्यांच्या नावावर बँक अकाउंट्स उघडली.
मोबाईल दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलीसांनी घायवळच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
निलेश घायवळ याच्यावर तब्बल ६ गुन्हे दाखल..
पहिला गुन्हा – गोळीबार प्रकरण
दुसरा गुन्हा – बनावट नंबर प्लेट
तिसरा गुन्हा – बनावट पासपोर्ट बनवल्या प्रकरणी
चौथा गुन्हा – घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेत असताना अवैधरित्या सापडलेले जिवंत काडतुसे
पाचवा गुन्हा – कोथरूडमध्ये एका बिल्डरला धमकवत दहा फ्लॅट नावावर करून घेतल्याप्रकरणी
सहावा गुन्हा – बनावट सिमकार्ड प्रकरण
दरम्यान, गुंड निलेश घायवळ हा सध्या स्विर्झलंडमध्ये आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्याला 90 दिवसांचा व्हिसा देखील मिळाला आहे. त्याच्या विरोधात जारी केलेली ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ इंटरपोलमार्फत विविध देशांमध्ये पाठवण्यात आली आहे. यामुळे त्याचा ठावठिकाणा कळण्यास मदत होणार आहे. घायवळला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.