मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका SMS वर दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्रे हलली ; शेतमजूर दाम्पत्याला घडवलं मुलाचं अंत्यदर्शन…

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला त्यांच्या मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले आहे. श्याम अंगरवार हा दुबईत नोकरीसाठी राहत होता. त्याचा अचानक झालेला मृत्यू तीन दिवसानंतर शेतमजूर दांपत्याला समजल्यानंतर त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. मात्र त्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले. त्यांच्या एका sms वर त्यांनी दिल्लीपासून ते दुबईपर्यंत सूत्रे हलवली. आणि त्या दांपत्याला आपल्या मुलाच दर्शन घडवून दिलं.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अनेक जण दुबईला नोकरीसाठी जातात. श्याम अंगरवार याची कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शेतमजूर असलेल्या आईवडलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो कामगार म्हणून दुबईला गेला. इमाद नावाच्या कंपनीत कामास होता. पण दुसरी चांगली संधी खुणावत होती. त्यामुळे त्याने ही कंपनी सोडली होती. मात्र शामला तापाचे निमित्त झाले. दुबई येथील एनएमससी रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, एक ऑक्टोबर रोजी श्यामचा मृत्यू झाला. इकडे किनवटमध्ये त्याच्या आई वडिलाना काही कल्पनाच नव्हती. लाडक्या मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना तीन दिवसांनंतर चार ऑक्टोबरला समजली. काय करावे समजेना. मदत तरी कोणाला मागायची? दु:खात बुडालेल्या या शेतमजूर दांपत्याची माहिती वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणाऱ्या गोवर्धन मुंडे यांना समजली. त्यांनी पाच ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना एक एसएमएस (मेसेज ) करून त्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केवळ एका एसएमएसवर हे समजले त्यांनी दिल्लीपासून ते दुबईपर्यंत सूत्रे हलवली. सतत पाठपुरावा केला. स्वत: खर्च करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.