एकनाथ शिंदेना मोठा धक्का, मुख्यमंत्री काळातील आणखी एक योजना गुंडाळणार?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत विविध योजना जाहीर केल्या होत्या. मात्र फडणवीस सरकारकडून त्या योजना आता बंद करण्यात येत आहेत.शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही योजना सरकार गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
5 डिसेंबर 2023 रोजी एकनाथ शिंदे यांनी’ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही योजना सुरू केली होती. राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकास हा तिचा उद्देश होता. दोन टप्प्यांत राज्यभर राबवलेल्या या उपक्रमात शाळांच्या विकासासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये लाखो रुपयांची पारितोषिके वाटण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये या योजनेची मोठी चर्चा झाली होती.
मात्र आता शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या उपक्रमावर प्रशासनाने लाल शेरा मारल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
दरम्यान ऑक्टोबर महिना सुरू झाला असतानाही या योजनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परिणामी,.शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील ‘आनंदाचा शिधा’ ही योजना आधीच थांबलेली असताना, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ही त्या यादीत गेली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.