बॉयफ्रेंडच्या खुनाचा भयंकर कट! दारू पाजली अन्…; घटनेने पुणे हादरलं


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

चाकण एमआयडीसी परिसरात प्रियकराचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी केवळ ४८ तासांत प्रेयसीसह तिघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली.

मिळालेल्या माहिती नुसार, खून झालेल्याचे नाव मुकेश कुमार (वय.२४) असे असून, अटक झालेल्यांमध्ये प्रेयसी आरतीकुमारी बिजलाऊराम उराव (वय.२३), तिचा भाऊ आकाश बिजलाऊराम उराव (वय. २१) आणि त्याची होणारी पत्नी बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (वय.२१, तिघेही रा. झारखंड) यांचा समावेश आहे. आरतीकुमारी आणि मुकेश यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते.

       

तथापि, मुकेश सतत आरतीकुमारीला मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून तिने आपल्या भावाला आकाश आणि त्याची होणारी पत्नी हिला बोलावून घेतले. दिनांक २ ऑक्टोबर रोजी रात्री आरतीकुमारी आणि मुकेश यांचा दारू प्यायल्यानंतर वाद झाला. याच दरम्यान तिघांनी मिळून रात्री अकराच्या सुमारास मुकेशला बेदम मारहाण केली. नंतर खोलीतील फरशी पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पुढे पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी मुकेशला ब्लँकेटमध्ये गुंडाळून खोलीजवळील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर विटा व दगडांनी मारून त्याचा खून केला. मृतदेहावर गवत टाकून तिघेही परत आले आणि नंतर खोली सोडून पसार झाले.

दिनांक 4 ऑक्टोबर रोजी कडाचीवाडी येथील निर्जनस्थळी कुजण्यास सुरुवात झालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील जावळे व सहकाऱ्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील नागरिकांना मृतदेहाचे फोटो दाखवून चौकशी करण्यात आली. दरम्यान, कडाचीवाडीत राहणारे काहीजण अचानक खोली सोडून निघून गेल्याचे समजले.

यातून पुढे खोलीच्या मालकाकडून माहिती मिळवून तांत्रिक तपास करण्यात आला. संशयित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी पथक पाठवून तिघांना बेड्या ठोकल्या. पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!