पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीत फटाके फोडणार असाल तर थांबा, आधी नियम जाणून घ्या..


पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात फटाके विक्री आणि वाजवण्यासंबंधी पुणे पोलीस आयुक्तालयाने कठोर नियमावली जाहीर केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत.

नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आवाज न करता केवळ रंग निर्माण करणारे फटाके फुलबाजी, अनार या वेळेनंतर वाजवण्यास मुभा असेल.

       

तसेच अ‍ॅटमबॉम्ब या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट स्फोटक फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि जवळ बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापरण्यास देखील पूर्णपणे मनाई आहे.

फटाका उडवण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी आहे. साखळी फटाक्यांसाठी ही आवाजाची मर्यादा १०५ ते ११५ डेसिबल पर्यंत असावी.

रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरापासून १०० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. या परिसरांना शांतता क्षेत्र म्हणजे सायलेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोणत्याही रस्त्यावर, पुलावर, घाट किंवा सेतूजवळ फटाके उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.

विक्रेत्यांसाठीही कडक नियम…

दरम्यान, यासोबतच फटाके विक्रेत्यांसाठीही नियम कडक करण्यात आले आहे. पुणे शहरात २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या काळातच तात्पुरते विक्री परवाने वैध असतील. तसेच, रस्त्यापासून १० मीटर अंतराच्या आत फटाके फोडणे, फेकणे किंवा अग्निबाण उडवण्यासही सक्त मनाई आहे. विक्रेत्यांनी आवाजाच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी या नियमांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सूचना देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!