पुण्यातील पोलीस भरती रखडली ; गृह विभाग आणि पोलीस प्रशासनात संघर्ष, पुण्याच्या पारड्यात नवीन पदे किती?

पुणे : शहराचा सतत वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेता पुणे शहर पोलीस दलात लवकरच मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. मात्र ही भरती आता रखडली असल्याची माहिती समोर आली आहे.राज्य मंत्रिमंडळाने १५ हजार पोलिस शिपायांच्या भरतीचा निर्णय घेताना पुणे पोलिस दलासाठी मंजूर केलेल्या हजार जागांमध्ये नंतर प्रशासकीय पातळीवर काटछाट करण्यात आली. परिणामी, पुणे पोलिस प्रशासन आणि गृह विभागात पुण्याच्या पदांवरून ‘संघर्ष’ सुरू आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या पारड्यात नेमकी पदे पडणार, यावर अंतिम निर्णय होत नाही तोवर भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारी निर्णय काढता येणार नसल्याची बाब समोर आली आहे.
नुकती शहरात नवीन पाच पोलीस ठाण्याच्या निर्मितीस मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल १७२० पोलीस पदांची भरती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर काटछाट करण्यात आली आहे.या भरतीत २०२२ आणि २०२३मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदाच अर्ज करण्याची संधी देण्यात येणार असल्याने राज्यभरातील लाखो उमेदवार या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. मात्र, पुण्यासह काही शहरांच्या पदवाटपावर एकमत न झाल्याने हा जी. आर. अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. परिणामी, भरती जाहिरात प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृह विभागाकडून प्रत्येक आयुक्तालयाला पदांचे वाटप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या वेळी पुण्यासाठी एक हजार पदांचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु गृह विभागाने ‘शहरासाठी सुमारे ८५० पदे पुरेशी आहेत,’ असा नवा प्रस्ताव तयार केला आहे. या ८५० पदांपैकी फक्त निम्मी म्हणजे सुमारे ४२५ पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुणे पोलिस दलाला आवश्यक असलेले मनुष्यबळ मिळण्यास विलंब होणार आहे.

