दिलासादायक! PNG-CNG चे दर कमी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय…!
नवी दिल्ली : मोदी सरकारने पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमती निश्चित करण्यासाठी नवीन फॉर्म्युला मंजूर केला आहे. गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटशी जोडलेली होती.
या निर्णयानंतर 8 एप्रिलपासून सीएनजी आणि पीएनजी या दोन्हीच्या किमती कमी होऊ शकतात. त्यामुळे पीएनजीच्या किमतीत सुमारे 10% आणि सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 5 ते 6 रुपयांनी घट होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत नैसर्गिक वायूची किंमत आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयातित क्रूडशी जोडली गेली आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.
गॅसची किंमत आता भारतीय क्रूड बास्केटच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या 10% असेल. दर महिन्याला यावर निर्णय घेतला जाईल. नवीन धोरणामुळे बाजारातील चढउतारांमुळे गॅस उत्पादकाचे नुकसान होणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने ग्राहकांची तोट्यातून सुटका होणार आहे.
नवीन फॉर्म्युल्यानुसार गॅसची किंमत निश्चित केल्याने खत आणि ऊर्जा क्षेत्रालाही स्वस्तात गॅस मिळू शकणार आहे. त्यामुळे खतांचे अनुदानही कमी होणार आहे.