हवेलीच्या तत्कालीन संचालकांवर मुख्यमंत्र्यांची कृपादृष्टी ! पणन विभागाच्या स्थगिती आदेशाने चौघांचे उमेदवारी अर्ज कायम…!
उरुळी कांचन : जयदीप जाधव
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दाखल झालेल्या ३०१ उमेदवारी अर्जापैंकी १०६ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले आहे. तर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सेवा संस्था गटातून बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, दिलीप काळभोर ,रोहिदास उंद्रे या उमेदवारांसह संचालक राहिलेले राजाराम कांचन यांच्या वरील हरकतीची अपिल फेटाळून त्यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती तब्बल १९ वर्षानंतर लोकनियुक्त संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे. बाजार समितीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापासून ते अगदी छाननी पर्यंत २००२ चे बरखास्त संचालक मंडळातील तत्कालीन संचालकांच्या उमेदवारी अर्जावर काय निर्णय होईल म्हणून तालुक्याचे लक्ष या प्रक्रियेकडे लागून होते.निवडणूक निर्णयअधिकारी यांच्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत माजी सभापती प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे , दिलीप काळभोर व संचालक राजाराम कांचन यांच्या विरोधात दाखल हरकतीत त्यांनी पणन विभागाच्या कारवाईच्या स्थगिती आदेशाने वरील चौघांविरोधात हरकत फेटाळल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले आहे.
हवेली बाजार समितीच्या १९९७ ते २००२ संचालक मंडळाच्या कालावधीत तत्कालीन संचालक मंडळावर ८ कोटी ६६ लाख ५० रुपये अर्थिक नुकसान भरपाईची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.पणनसंचालकांच्या चौकशी आदेशाने तत्कालीन मुलानी समितीने या संचालकांवर संस्थेचे ८ कोटी ६६ लाख ५० हजार रुपये नुकसानीची शिफारस केली आहे. तद्नंतर ही कायदेशीर प्रक्रिया उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने या सुणावनीची प्रक्रिया जैसे थे ठेवली आहे. याच दरम्यान नव्याने २०२२ साली जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी नोटीसा काढल्या आहेत.पणन संचालकांच्या आदेशावर तत्कालीन संचालकांनी पणन मंत्र्यांकडे अपिल केले आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकक्षेत असलेल्या पणन विभागाने या संचालकांवरील कारवाईस स्थगिती दिल्याने या स्थगिती आदेशाने या तत्कालीन संचालकांचे अर्ज कायम राहिले आहेत.
दरम्यान हवेली बाजार समितीच्या एकून ३०१ दाखल उमेदवारी अर्जांपैकी १९५ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर १०५ अर्ज बाद ठरले आहेत. प्रामुख्याने हे अर्ज आरक्षित जागानिहाय न भरल्याने बाद ठरविले आहे. छाननी अखेर १९५ अर्ज कायम राहिले आहेत.
बाजार समितीच्या मतदारसंघनिहाल कायम राहिलेले अर्ज पुढीलप्रमाणे –
सहकारी सेवा संस्था ७८ , महिला
सेवा संस्था -११, सेवा संस्था भटक्या जाती / जमाती ९,
मागासवर्गीय सेवा संस्था १४, ग्रामपंचायत खुली जागा
२६, अर्थिक दुर्बल प्रतिनिधी जागा १४, अणु जातीजमाती
८, हमाल प्रतिनिधी १९ तर मापाडी १९ असे कायम राहिले आहेत.