बंडू आंदेकर अखेर गजाआड! पुणे पोलिसांनी कसा रचला सापळा, तीन दिवस पाळत अन् आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताच रात्री सगळ्यांना उचललं…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली.

अमन पठाण आणि यश पाटील या शार्पशूटर्सनी आयुषवर तब्बल ११ गोळ्या झाडल्या, त्यापैकी नऊ गोळ्या शरीरात लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आयुषची आई कल्याणी कोमकरने बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल केला.
मात्र गुन्हा दाखल होण्याआधीच आंदेकर कुटुंब फरार झाले. गणेशोत्सवाचा काळ आणि खुनाची गंभीर घटना या दोन्हींचा ताण सांभाळत पोलिसांनी हे आव्हान स्विकारले आहे. गुन्ह्यानंतर आंदेकर टोळीला पकडणे हे मोठे आव्हान होते.

पोलिसांनी आंदेकर कुटुंबाच्या हालचालींवर तीन दिवस गुप्त पाळत ठेवली. त्यांच्या लपण्याच्या जागांवर सतत लक्ष ठेवले गेले. शेवटी योग्य वेळी सापळा रचून बंडू आंदेकरसह सहा जणांना महाराष्ट्राबाहेरून अटक करण्यात आली.

सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात आयुष कोमकरचा अंत्यसंस्कार पार पडला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी टोळीवर झडप घातली. बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, त्यांची आई आणि आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. यापूर्वीच यश पाटील आणि अमित पोटोळे यांना अटक झाली होती. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे.
या प्रकरणात एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू अण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आदींचा समावेश आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर या टोळीचा मोठा प्रभाव कमी झाला असला तरी इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.