सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळणार, ‘एवढे’ टक्के महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता..

नवी दिल्ली : केंद्र सरकार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकतं. आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवून देऊ शकतं.

तसेच ७ व्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या DA 55% आहे, तो आता वाढून ५८% वर पोहोचणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार ऑक्टोबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात या वाढीची घोषणा करू शकते. ही वाढ जुलै २०२५ पासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे थकीत पैसे ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळणार आहेत.

जानेवारी-जून कालावधीसाठी घोषणा साधारणपणे होळीपूर्वी केली जाते.

जुलै-डिसेंबर कालावधीसाठी घोषणा दिवाळीपूर्वी केली जाते.
यंदा दिवाळी २०-२१ ऑक्टोबर रोजी आहे. त्यामुळे या अगोदरच DA वाढ जाहीर होण्याची खात्री आहे.
महागाई भत्त्याची गणना CPI-IW (औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक) यावर आधारित केली जाते. जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीतील CPI-IW ची सरासरी १४३.६ इतकी होती. त्यावरून नवीन DA 58% इतका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही वाढ 7 व्या वेतन आयोगांतर्गत शेवटची असणार आहे. कारण या आयोगाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. पुढील वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचे लक्ष आता 8 व्या वेतन आयोगाकडे आहे.