धक्कादायक! आधी प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, त्यानंतर विवाहाचं आमिष दाखवून पुण्यातील हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार, तब्बल दोन लाखाला उकळले…

पुणे : गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियातून झालेल्या ओळखीतून तरुणींची फसवणूक होत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच आता मॅट्रिमोनी वेबसाइटवर झालेल्या ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवलं आणि तिला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार इतक्यावरच न थांबता फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमित गंगाधर शेंडगे, (रा. पारगाव, जि. सोलापूर, )असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून, पीडित तरुणीने खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पीडित तरुणी आणि आरोपी यांची ओळख गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एका मॅट्रिमोनी वेबसाइटवर झाली. विवाहाचे आमिष दाखवून शेंडगेने तरुणीला विश्वासात घेतले. त्यानंतर तो पुण्यात आला आणि तरुणीची भेट घेऊन तिला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाइलमध्ये छायाचित्रे काढली. त्याने या छायाचित्रांचा आधार घेऊन तरुणीला तब्बल दोन लाखाला लुबाडले.
दरम्यान तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
