गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय! मद्य विक्री बंदी ते वाहतूक बदल, नवीन अपडेट काय? जाणून घ्या..

पुणे : शहरात सध्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. यंदा मेट्रो प्रवाशांची संख्या विक्रमी वाढली असून, नागरिकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेसाठी पुणे प्रशासनाने नवे नियम लागू केले आहेत. यात वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था, पार्किंगची ठिकाणे, मद्यविक्री बंदी आणि ध्वनीप्रदूषणासंबंधी दुरुस्तीचे आदेश समाविष्ट आहेत.

पुण्यात गणेशोत्सवामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात म्हणजे ३० ऑगस्ट रोजी मेट्रोच्या प्रवाशांची संख्या तब्बल एक लाखाने वाढून ती ३ लाख ६८ हजार ५१६ वर पोहोचली. या वाढीमुळे मेट्रोचे उत्पन्नही १३ लाखांनी वाढले आहे.
दरम्यान, पुणेकरांची सोय लक्षात घेऊन गणेशोत्सवादरम्यान मेट्रोची सेवा रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोला पुणेकरांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

तर दुसरीकडे गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने २७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, निलयम टॉकीज, फर्ग्युसन कॉलेज आणि एसपी कॉलेज यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. यातील काही ठिकाणी दुचाकी तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांचे पार्किंग देण्यात आले आहे. ज्यामुळे भाविकांना आपली वाहने सुरक्षितपणे पार्क करता येतील.
पुण्यात विसर्जनावेळी दुचाकी कुठे पार्क कराल?
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, शिवाजी आखाडा वाहनतळ, देसाई कॉलेज – पोलिस पार्किंग १७, विमलाबाई गरवारे हायस्कूल, गोगटे प्रशाला आपटे प्रशाला, मराठवाडा कॉलेज, पेशवा पथ, रानडे पथ, पेशवे पार्क सारसबाग, हरजीवन रुग्णालयासमोर सावरकर चौक, काँग्रेस भवन रस्ता पाटील प्लाझा पार्किंग, पर्वती ते दांडेकर पूल, दांडेकर पूल ते गणेशमळा, गणेशमळा ते राजाराम पूल, चारचाकी पार्किंगची ठिकाणे, निलायम टॉकीज, हमालवाडा, पत्र्यामारुती चौकाजवळ, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजीवनी मेडीकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज, एसएसपीएमएस शिवाजीनगर जैन हॉस्टेल बीएमसीसी रस्ता, एसपी कॉलेज, पीएमपीएमएल मैदानपुरम चौकाजवळ, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, नदी पात्र भिडे ते गाडीतळ पूल, मद्यविक्री पूर्णपणे बंद.
दरम्यान, त्यासोबतच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) या दोन दिवशी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. तसेच मिरवणूक संपेपर्यंत दुकाने आणि आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, सार्वजनिक शांतता सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे.