……. तेव्हाच मुंबई सोडणार ; मनोज जरांगेंचा आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सरकारला इशारा

पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सकाळीच दाखल झाले. यानंतर आंदोलनस्थळाच्या व्यासपीठावरून त्यांनी आंदोलकांना संबोधित केल आहे. तसेच आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही आणि मुंबई देखील सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा निर्धार देखील जरांगेंनी पुन्हा व्यक्त केला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी मनोज जरांगे यांना एक दिवसाची परवानगी आणि 5000 आंदोलकांच्या अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांनी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून चाकण, तळेगाव, लोणावळा,वाशीमार्गे येत त्यांनी आता आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे परवानगीचा मुद्दा सरकारवरच शेकण्याची शक्यता असल्याने सरकार त्यावर फेरविचार करणार की जरांगे याच्या आंदोलनावर तोडगा निघाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
आझाद मैदानावर पोहोचतात आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जरांगे पाटील यांनी आपल्या मराठी बांधवांना काही सूचना दिल्या तर काही आवाहन देखील केलं. मनोज जरांगे म्हणाले, आपलं ठरलं होतं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण मुंबईतील आझाद मैदानावर जायचं..आपण मुंबईत आलोय. सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून आपण मराठ्यांनी मुंबई जाम करण्याचं ठरवलं होतं आणि तसं केलंय. सरकारने सहकार्य केलंय. आंदोलनाला एक दिवसाची परवानगी दिली. त्याबद्दल सरकारचे आभार… आता तुम्ही मुंबईकरांना, मुंबई पोलिसांना सहकार्य करा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं.

मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका, शांततेत रहा, गडबड गोंधळ करून नुकसान करून घेऊ नका, असंही सांगत जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं.
