‘इलेक्शन मध्ये उभे राहू नको नाहीतर…; पुण्यातील माजी नगरसेवक अविनाश बागवेंना खंडणीसाठी धमकी…!
पुणे : काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाइलवर संपर्क साधून अज्ञात व्यक्तीने ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
‘इलेक्शन मध्ये उभे राहण्याच्या भानगडीत पडू नको, अन्यथा गोळ्या घालून ठार मारू’ अशी धमकी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना दिली आहे तसेच बागवे यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे़
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार भवानी पेठेत मंगळवारी दुपारी ३ ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडला होते. अविनाश बागवे यांना काल एका अज्ञात इसमाने व्हाट्सअप वर मेसेज करून “तीस लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद” करू अशी धमकी दिली आहे. तसेच पुढे या व्यक्तीने, “तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो” असा आणखी एक मेसेज आला.
या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा तपास करत आहेत.