पहलगाम हल्ल्यात पित्याचं निधन ; पुणे महापालिका प्रशासनात आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा..


पुणे : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला. आता संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिका प्रशासनात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे महापालिकेने वर्ग दोन आणि वर्ग तीनमधील चार पदांपैकी एका ठिकाणी आसावरी जगदाळे यांना नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर आसावरी जगदाळे यांना महापालिकेत नोकरी देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी यांना प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार आसावरी यांनी नगरविकास विभागाकडे शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात अर्ज केला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आसावरी यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, यासाठी शिफारस केली होती. शिंदे यांनी त्यानुसार पुणे महापालिकेला कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता.महापालिकेचे आयुक्त राम यांनी आसावरी यांच्या शिक्षणाची माहिती घेतली. महापालिका प्रशासनाने आसावरी यांच्याकडील शिक्षणाच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना महापालिकेत कुठल्या पदावर सामावून घेता येऊ शकते, याची पडताळणी केली.

दरम्यान आतापुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार वर्ग दोन आणि वर्ग तीनमधील चार पदांपैकी एका पदावर आसावरी जगदाळे यांची नियुक्ती करणे शक्य होणार असल्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!