पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवर ‘जीपीएस’ ची नजर ; कसा होणार फायदा?

पुणे : ‘गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ही पुण्याची ओळख आहे. लाखो भाविक यात सहभागी होतात. त्यामुळे वाहतुकीचे सुयोग्य नियोजन आणि मिरवणुकीची गती राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवरच आता पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीवर जीपीएस ची नजर असणार आहे. त्याद्वारे पोलीस गणेश मंडळाच्या हालचालीवर वॉच ठेवणार आहेत.यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यावरील मंडळांचा समावेश आहे.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, मिरवणुकीची गती कायम ठेवण्यासाठी आणि दोन मंडळांमधील अंतर योग्य राखण्यासाठी प्रमुख २५ गणेश मंडळांच्या रथांना ‘जीपीएस’ प्रणाली बसवली जाणार आहे. त्याद्वारे पोलिस गणेश मंडळांच्या हालचालीवर वॉच ठेवणार आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम वारी सोहळ्यात राबवण्यात आला होता. त्यानंतर आता गणेश विसर्जन मिरवणुकीत जीपीएसची करडी नजर असणार आहे.
या जीपीएस प्रणालीमुळे पोलिसांच्या टॅबवर गणेश मंडळांचे थेट लोकेशन प्राप्त होईल. वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांच्या टॅबवरून मंडळांचे लोकेशन पाहतील. ‘जीपीएस’वर नजर ठेवून ते त्वरित सूचना देऊ शकतील. प्रत्येक मंडळासोबत पोलिसांचा एक समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. तो अधिकारी मंडळ प्रमुखांशी संवाद साधून मिरवणूक वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

दरम्यान यंदाच्या प्रमुख मंडळांच्या रथांना ‘जीपीएस’ बसवले असून, त्याद्वारे मिरवणूक वेळेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी पोलिस सज्ज राहतील,’ असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.
