मोठी बातमी ! वाघोलीत सुमारे ७६ लाख १ हजार ७१० रुपये एवढ्या किंमतीचा ३५१ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त ; मॅफेड्रॉन आढळल्याने मोठी खळबळ….

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील वाघोली येथे गुन्हे शाखेने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी छापा टाकून सुमारे ७६ लाख १ हजार ७१० रुपये एवढ्या किंमतीचा ३५१ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी दोन परप्रांतीय तस्करांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कारवाई तांबे वस्ती, गुलमोहर पार्कच्या मागे वाघोली येथे करण्यात आली आहे. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रामेश्वरलाल मोतीजी आहिर (४५, रा. चित्तोडगड, राजस्थान) ल नक्षत्र हेमराज आहिर (२५, रा. चित्तोडगड, राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१५ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी युनिट सहाचे पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना खब-याकडून वाघोली येथील तांबे वस्ती परिसरांत दोन संशयित फिरत असून त्यांचेकडे मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे एम.डी. हा अंमली पदार्थ आढळून आला. त्यांच्याकडून ७६ लाखांचे एम. डी जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी अटक करण्यात आलेले दोघे राजस्थान येथील रहिवासी असून त्यांनी अंमली पदार्थ कुठून आणले, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सदर कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, वाहीद पठाण यांच्या पथकाने केली आहे.