‘वसंतदादांचं सरकार मीच पाडलं ‘; पुण्यात शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली ; वातावरण तापणार..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात आपणच वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्याची जाहीर कबुली दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांच्यावर सातत्याने वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला जातो. आता या कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार आम्ही कसे व का पाडले याबाबतचा खुलासा केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते. मात्र वसंतदादा पाटील हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आमचा इंदिरा काँग्रेसला विरोध होता. वसंतदादा पाटील यांचे आम्हाला मार्गदर्शन सातत्याने मिळत असे. ही मोठ्या मनाची माणसे होती. या सर्व लोकांचे अंतकरण मोठे होते. यांनी महाराष्ट्रात एक मोठी नेतृत्वाची फळी निर्माण केली होती.त्यामुळे महाराष्ट्र देशात एक चांगले राज्य म्हणून लौकिक मिळवू आणि टिकू शकला आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला. दरम्यान यानंतर झालेल्या निवडणुकी काँग्रेसला बहुमत मिळाले नाही.इंदिरा काँग्रेस आणि आम्हाला काही जागा मिळाल्या. यामुळे आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री केले. मात्र, आमच्या तरुणांचा इंदिरा काँग्रेसवर राग होता. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचे त्यामुळे आमच्यात एक अंतर होते.
वसंतदादा हे आमचे नेते होते. वसंतदादांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केला. याला आमचा विरोध होता. परिणाम असा झाला की, आम्ही ठरवले वसंतदादांचे सरकार घालावयाचे. वसंतदादांचे सरकार आम्ही घालवले आणि मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो मी माझ्या हातात राज्याची सत्ता आली अशी जाहीर कबुली शरद पवार यांनी यावेळी दिली.