पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; कोयता घेऊन ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न, एकट्या सोनाराने चोरीचा डाव उधळला….

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून भर दुपारी औंध मधील एका ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. पण दुकानदाराच्या धाडसाने चोरट्यांना आपली दुचाकी सोडून पळण्याची वेळ आली. एकट्या सोनाराने चोरीचा डाव उधळून लावला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,नेमाराम चौधरी (वय ५८) यांचे औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्समध्ये रामदेव ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे. स्वातंत्र्य दिन असल्यामुळे रस्त्यांवर रहदारी कमी आणि दुकानात गर्दी सुद्धा नव्हती. त्यामुळे नेमाराम चौधरी दुकानात एकटे असल्याचा फायदा घेऊन तिघेजण दुकानात शिरले.त्यांच्या हातात कोयते होते, तलवारी होत्या. हातातील हत्यार पाहून नेमाराम चौधरी यांना चोरटे आपल्या दुकानात घुसले असल्याचा अंदाज आला. त्यांना कळण्याच्या आतच तीनही चोरट्यानीं त्यांच्यावर हल्ला चढवला.चोरट्यांनी हल्ला चढवताच तितक्याच ताकतीने चौधरी यांनी त्यांचा प्रतिकार केला.चौधरी यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागले आणि हे पाहताच चोरटे दुचाकी तेथे सोडून पळून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
चोरट्यांना दुकानातून काही चोरुन नेता आले नाही. पण चोरट्यांचा नेमका चोरीचा प्रयत्न होता की आणखी काय कारण होते, याची तपासणी आता पोलीस करीत आहेत. दरम्यान दिवसाढवळ्या हातात कोयते घेऊन चोरीचा प्रयत्न झाल्याने पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.