दौंड हादरलं!! कोयत्याने सपासप वार करून तरुणाचा खून, धक्कादायक माहिती आली समोर…

दौंड : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
सध्या अशीच एक धक्कादायक घटना दौंड तालुक्यातून समोर आली आहे. आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे चिडलेल्या मुलाने आईच्या प्रियकराला कोयत्याने सपासप वार करून त्याला ठार मारल्याची घटना दौंड शहरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना १४ ऑगस्ट च्या रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली आहे. याबाबत नितीन अशोक गुप्ते (वय- 41 वर्षे, व्यवसाय- भाजी विक्री, रा.सरपंचवस्ती, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (ता.१४) रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास दौंड (जि.पुणे) शहराच्या हद्दीत असणाऱ्या इंदीरानगर येथील जब्बार शेख यांचे घरासमोर विशाल उर्फ नण्या किसन थोरात याच्या आई चे प्रवीण दत्तात्रय पवार याच्या सोबत असलेल्या अनैतीक संबंधाच्या कारणावरून विशाल थोरात याने प्रविण पवार याच्या डोक्यात, तोंडावर, हातावर कोयत्याने सपासप वार करून त्यास ठार केले.
दरम्यान, १५ ऑगस्टच्या पूर्वरात्री अचानक दौंड शहरात घडलेल्या या खुनामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. आईच्या अनैतिक संबंधांमुळे मुलाने एकाला संपविल्याने दौंड शहरात चर्चेला उत आले आहे.
दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई रूपेश कदम करीत आहेत.