पुणे हादरलं ; पतीचा चारित्र्यावरून संशय, दोघांमध्ये सारखा वाद,अखेर पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

पुणे : विद्येच माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विवाहितांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतच चाललं आहे.
हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर विवाहितेंच्या सुरक्षेतेसाठी अनेक स्तरातून आवाज उठवला जात असतानाच आता सासरकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राणी भागवत कदम असं मृत विवाहितेचे नाव आहे.राणीवर तिचा पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम हे दोघेही सतत जाच करत होते. गेल्या काही दिवसांपासून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घालत असे. सततच्या या त्रासामुळे राणी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. अखेर तिने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. ही घटना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.या प्रकरणी पती आणि सासूला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान प्राथमिक तपासात राणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम यांना अटक करण्यात आली असून, पत्नीचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.