शरद पवारांच्या अडचणी वाढणार ; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी चौकशी करण्याची भाजपच्या नेत्याची मागणी..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये केलेल्या गौप्यस्फोटाने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ते मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, असा दावा त्यांनी केला आहे.त्यांच्या या विधानाची अद्याप सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार यांची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजप आमदाराने केली आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब उच्चस्तरीय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत. शरद पवार ईडीकडे जसे स्वतःहून गेले तसेच या चौकशीला त्यांनी स्वत:हून सामोरं जावं असं बंब यांनी म्हटलं आहे.राज्याचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, त्यांच्याकडेही असेच लोक आले होते, दानवे यांनी त्यांना त्वरित पोलिसांच्या हवाली केलं. तसं शरद पवार यांनी दुसऱ्या रूममधून पोलिसांना फोन लावून त्या दोन लोकांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं. मग त्यांनी तसं का केलं नाही ? असा सवाल बंब यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान या प्रकरणी आता शरद पवार यांची एक उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.