रोहित्र फोडून चोरट्यांनी दीड लाखांच्या तांब्याच्या तारा लांबविल्या, कुंजीरवाडी येथील घटना..

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी पाणीपुरवठा योजनेचे व खालचे तरडे येथील रोहित्र फोडून अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश बाळकृष्ण भोंडवे (वय ३३, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोंडवे हे उरुळी कांचन महावितरणाच्या उपविभागीय कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तरडे व म्हातोबाची आळंदी या दोन गावतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. रविवारी तरडे गाव येथील रोहित्र जमिनीवर पडले आहे. अशी माहिती भोंडवे यांना एका शेतकऱ्याने दिली.
दरम्यान, याची माहिती मिळताच, ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता त्यांना रोहित्राचे झाकण काढून त्यातुन कॉपरच्या वायर चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर कुंजीरवाडी पाणीपुरवठा योजनेचे रोहित्र चोरट्यांनी फोडले या दोन्ही रोहित्रातील १ लाख ५९ हजार रुपये किंमतीच्या ६५० किलो तांब्याची तारा चोरून नेल्या आहेत.
याप्रकरणी निलेश भोंडवे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास शिंदे करीत आहेत.