धक्कादायक! पुण्यात कोयत्याने दोन तरुणांवर सपासप वार ; काँग्रेस नेत्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

पुणे : गुन्हेगारी घटनांमुळे वारंवार चर्चेत असलेल्या पुण्यात दोन गटात रोडवर बोर्ड लावल्यावरून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत कोयत्याने सपासप वार करून एका गटातील दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत काँग्रेसचे नेते गोपाल तिवारी यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नारायण पेठेत दोन गटात बोर्ड लावल्यावर वाद झाला. विनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते योगेश पेटकर मंडपवाले कलाटकर यांनी मुरलीधर हॉटेलजवळील रस्त्याच्या कडेला सूचना फलक लावला होता. फिर्यादी हे मंगळवारी तेथे आले होते. गोपाळ तिवारी व अन्य दोघे यांनी तो बोर्ड काढण्यास सुरुवात केली. तेव्हा मोरे यांनी हर्षद शिर्के याला बोर्ड काढू नका, तो बेकायदेशाीर असल्यास मनपा काढून घेतील, असे म्हणाले. यावरुन त्यांच्या जोरदार वाद झाला. या हाणामारीत कोयत्याने वार करून एका गटातील २ तरुण जखमी झाले होते. याप्रकरणी स्वप्नील रामचंद्र मोरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून गोपाळ तिवारी यांच्यासह सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंद शिर्के (वय २७), हर्ष शिर्के (वय २९), निखिल जगताप (वय ३३) आणि अभिषेक थोरात (वय २२) यांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यात काँग्रेसचे नेते गोपाल तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.