पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार ; मुंबईत युगेंद्र पवार -तनिष्काचा साखरपुडा, थोरल्या पवारांसह अजितदादांची हजेरी

पुणे : पवार कुटुंबीयांची राजकीय पटलावरची वाटचाल वेगवेगळी असली तरी कौटुंबिक आणि नातेसंबंधात त्यांच्यातील जिव्हाळा अनेकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा लग्न समारंभ मोठ्या थाटात पार पडला होता.त्यानंतर आता त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा होत आहे. त्यासाठी पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र आले आहेत.
सध्या पवार कुटुंबीय राजकारण बाजूला सारून साखरपुड्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीत आज 3 ऑगस्ट रोजी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा होत आहे. या सोहळ्यासाठी सर्व पवार कुटुंबीय एकत्र येत आहेत. या सोहळ्याला शरद पवार यांच्यासह अजित पवारांची ही उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे दोघेही उपस्थित असणार आहेत. या मंगलसोहळ्यानिमित्ताने या कुटुंबातील तीनही पिढ्या एकत्र येणार आहेत. वडिलधारी मंडळींच्या आशीर्वाद घेत हे नव दाम्पत्य लवकरच गृहस्थाश्रमात प्रवेश करतील.
दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी अजितदादांविरोधात शड्डू ठोकले होते. या निवडणुकीत अर्थातच अजितदादांचा अनुभव कामी आला. पण कौटुंबिक आणि राजकीय हितसंबंध एकत्र करण्याची गल्लत पवार कुटुंबीय करत नाही ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. आज मुंबईत होणाऱ्या साखरपुड्याच्यां निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र दिसणार आहे.