मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांची राज्य कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड…

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची राज्य कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे आता राजकीय, क्रिकेट आणि आता कुस्तीच्या आखाड्यात उतरले आहेत. याबाबत रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघ आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, स्व. मामासाहेब मोहोळ आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांच्या या संघटनेचं नेतृत्त्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतेय, हे माझं भाग्यच आहे. आदरणीय पवार साहेबांनी तर तब्बल चार दशकं या संघटनेचं नेतृत्व केलं आणि आजही ते या संघटनेचं प्रतिनिधीत्व करत आहेत.
मध्यंतरी राज्यकीय द्वेषातून संघटनेबाबत वाद निर्माण केले गेले पण या निविडणुकीच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद’ हिच खरी संघटना आहे, यावरही शिक्कामोर्तब झालं. जिल्हा परिषद, विधानसभा, क्रिकेटनंतर आता कुस्तीच्या चौथ्या मैदानात ‘खेळण्याची’ संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली.
ही आजवर प्रत्येक ‘मैदानात’ केलेल्या चांगल्या कामाची पावतीच आहे, असं मी समजतो. या संधीचं सोनं करून राज्यातील कुस्तीला गतवैभव प्राप्त करुन देणं, पैलवानांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा मिळवून देणं आणि मातीतल्या या खेळाला आभाळाइतकं मोठं करण्याचा माझा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न राहील.
या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा कुस्ती संघ, पैलवान, वस्ताद, पंच यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील सर्वंच मान्यवर मंडळींनी मोलाचं सहकार्य केलं. याबाबत या सर्वांचे पुनश्च आभार! माझ्यासोबतच सचिव विजय बराटे यांच्यासह उपाध्यक्ष आणि इतर सर्वच पदांवर बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचंही मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही ते म्हणाले.