लाडक्या बहीण योजनेतून आता २६ लाख लाडक्या बहिणी आऊट, नेमकं कारण काय?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहिम राबवली गेली. महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून यासाठी माहिती मागवली होती.
यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचा दावा सरकारने केला आहे.
काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत, असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे २.२५ कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून२०२५ महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे.
अशी माहिती ही या निमित्ताने आदिती तटकरे यांनी दिला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. शिवाय या योजनेचा जवळपास १४ हजार पेक्षा जास्त पुरूषांनी लाभ घेतल्याचा दावा सुळे यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे शासन स्तरावर खळबळ उडाली आहे. शिवाय आदिती यांच्या या ट्वीटमुळे त्यात तथ्य असल्याचं ही स्पष्ट झालं आहे.