ताम्हिणी घाटात सापडलेल्या’ त्या’ तरुणाच्या मृतदेहाचं गुढ उकललं ; पुणे कनेक्शन समोर

पुणे : ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आल आहे. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खून झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला अटक केली आहे.व्यसनाच्या आहारी गेलेल्या लहान भावाशी झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत अनिल शिर्के (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. हृषीकेश अनिल शिर्के (वय २३, दोघे रा. गायकवाड चाळ, मावळे आळी, कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाच्या परिसरात घडली. दोघेही देवदर्शनासाठी निघाले होते. व्यसनाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. ऋषिकेशला दारू आणि गांजाचे व्यसन होतं. ऋषिकेशला व्यसन सोडण्यास अनिकेतने सांगितलं.त्यानंतर रागाच्या भरात अनिकेतने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले व त्याचा मृत्यू झाल्यानंतर अनिकेत पसार झाला.अनिकेतने सख्ख्या भावाला ताम्हिणी घाटात मारून टाकले आहे, अशी माहिती कर्वेनगर चौकीचे उपनिरीक्षक सचिन तरडे यांना मिळाली. त्याची खातरजमा करून वारजे पोलिसांच्या पथकाने अनिकेतचा शोध घेण्यास सुरुवात केली.तो वनदेवी मंदिराच्या मागील टेकडीच्या परिसरात लपून बसला होता. तेथून पोलिसांनी अनिकेतला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने सख्ख्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलिसांनी ही कारवाई केली.
दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी पुणे ग्रामीण व पौड पोलिसांशी संपर्क साधला. त्या वेळी शनिवारी पहाटे गोणवडी परिसरात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याचे पौड पोलिसांनी सांगितले.