गणेशोत्सवासंदर्भात आयुक्त अमितेश कुमार यांचं मोठं वक्तव्य, पुणेकरांना मोठा दिलासा, दिली आनंदाची बातमी…


पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात पुणे पोलिसांकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावले जाणार नसल्याचं आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं आहे. पुणे शहरातील नागरिक आणि गणेश मंडळांसाठी हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना उत्सवाच्या तयारीसाठी अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे.

गेल्या वर्षी जे गणेश मंडळांना परवाने मिळाले होते, ते यंदाही वैध मानले जातील. त्यामुळे नव्याने स्वतंत्र पोलीस परवानगी घेण्याची गरज भासणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे गणेश मंडळांचे नियोजन अधिक सुलभ होणार असून, उत्सव शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी पार पडला.

दरम्यान, या स्पर्धेत एकूण १९४ मंडळे आणि शाळांनी सहभाग घेतला होता. यापैकी 106 मंडळांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली असून एकूण 14 लाख ९५ हजार रुपयांची बक्षीस रक्कम वाटण्यात आली.

या स्पर्धेत भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ (एरंडवणे) आणि पोटसुळ्या मारुती मंडळ (नाना पेठ) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केले आहे.

कार्यक्रमात अण्णा थोरात यांनी यंदाच्या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे विसर्जन मिरवणूक सकाळी 8.30 वाजता सुरू करून दुपारी १२ वाजेपर्यंत संपवावी, अशी सूचना त्यांनी केली. या निर्णयामुळे धार्मिक आणि खगोलशास्त्रीय घटकांचा योग्य समन्वय राखण्यात येणार आहे.

याचवेळी, माजी आमदार उल्हास पवार यांनी सांस्कृतिक गणेशोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आज डीजे आणि मोठा आवाज यालाच महत्त्व दिलं जातं; मात्र उत्सवाचं खरी संकल्पना लोकजागृती आणि सामाजिक ऐक्य आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!