पुण्यात भाऊ -बहिणीच्या नात्याला काळीमा; प्रॉपर्टीसाठी बहिणीला जबरदस्ती इंजेक्शन दिलं अन्…

पुणे: पुण्यात भावा -बहिणीच्या नात्याला काळीमा बसणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला वेड्याचं इंजेक्शन देऊन मालमत्तेसाठी मानसिक रुग्णालयात दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांनी आरोपी धमेंद्र इंदूर रॉय आणि चार खासगी बाऊन्सरवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडिलोपार्जित ताबा मिळवण्याच्या हेतूने आरोपी धर्मेंद्र इंदुर रॉयने खाजगी बाउन्सरच्या मदतीने आपल्या सख्ख्या बहिणीच्या डाव्या हातात इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. यानंतर, रक्त तपासणीच्या नावाखाली तिला खोटे सांगून मानसिक रुग्णालयात दाखल केले. या कृत्यामुळे पीडितेला गंभीर मानसिक छळ सहन करावा लागला.चतुर्शृंगी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी धमेंद्र इंदूर रॉय आणि त्याच्यासोबत असलेल्या चार बाऊन्सरवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली असून, या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून तिला सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.या घटनेमुळे भावा-बहिणीच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.