मोठी बातमी! रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले, पती पत्नीसहीत भावंडांना जलसमाधी…

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी आरे वारे समुद्रात बुडून दोन लहान भावंडांसह एका जोडप्याचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे जोडपे रत्नागिरीतील ओसवाल नगरचे रहिवासी होते. तर, भावंडे ठाणे मुंब्राहून पाहुणे म्हणून आली होती. पावसाळ्यामुळे समुद्र खवळलेला असताना ही घटना घडली आहे.
ठाणे मुंब्राहून उज्मा शेख आणि उमेरा शेख रत्नागिरीला आले होते. शनिवारी सायंकाळी ते दोघे जैनब काझी आणि जुनैद काझी यांच्यासोबत समुद्रावर गेले. हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यावेळी मोठ्या लाटा येत होत्या. चौघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते आतमध्ये ओढले गेले आणि समुद्रात बुडाले.
यावेळी काही लोकांनी त्यांना बघितले. आरडाओरडा लक्षात येताच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे राजेंद्र कदम आणि राजेंद्र यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उशिरापर्यंत घटनेची नोंदणी केली. सध्या पावसाळा असल्याने याठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाहीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे.