गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या बारवर धाड, 22 बारबाला ताब्यात, धक्कादायक माहिती आली समोर…

मुंबई : शिंदेसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या बारवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातील एफआयआर समोर आलेला आहे. बारमध्ये अश्लील नृत्य सुरु असल्याने पोलिसांनी कारवाई केली.
बारचा परवाना ज्योती यांच्या नावाने असल्याची कबुलीही रामदास कदम यांनी दिलेली आहे. यामुळे आता कदम पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. कांदिवलीत असलेल्या सावली बारवर छापा पडला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास सुरु झालेली कारवाई पहाटे चारपर्यंत चालली. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली.
यामध्ये २२ बारबाला, २५ ग्राहक, वेटर, कॅशियर, मॅनेजरला अटक केली. पोलिसांनी मॅनेजरचा जबाब नोंदवला. त्यात त्याने बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचं सांगितले आहे. यामुळे याबाबत सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. ज्योती कदम या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत.
त्या माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आहेत. योगेश कदम यांच्यावर थेट आरोप झाल्यानं शिंदेसेनेची गोची झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सेनेचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, याबाबत कदम म्हणाले, सावली बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावावर आहे. पण तो बार गेल्या ३० वर्षांपासून शेट्टी नावाचा इसम चालवतो. आमच्याकडे ऑर्केस्ट्राचं आणि वेटरचं लायसन्स आहे. तिथे अश्लील डान्स चालत नाही, असे त्यांनी सांगितले आहे.