सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणार, मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती..

मुंबई : मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईल, असे देखील ते म्हणाले आहे.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करतोय असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईचा मेकओव्हर खऱ्या अर्थाने आम्ही करतोय.

मुंबईसाठी सर्वाधिक काम महायुती सरकारच्या काळात झालंय. ही कामं मुंबईकरांच्या जीवनात अमुलाग्र बदल करणारी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईचा सर्वात मोठा विकास आम्ही करतोय. मुंबईचा सर्वार्थाने कायापालट केला जात आहे.
मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम आम्ही करीत आहोत. यामध्ये मोतीलाल नगर गोरेगाव, जीटीपी नगर येथे समुह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ४९०० रहिवाशांना घरे मिळणार आहेत.
कामाठीपुरा अभ्युदयनगर इथल्या समुह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर २०२५पर्यंत ती पूर्ण होईल. ११ हजार ४११ भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे.