वडापाव, समोसे आवडीने खाताय? थांबा! आता सरकारच देणार हेल्थ अलर्ट, नेमका प्रकार काय, वाचा महत्वाची माहिती…

नवी दिल्ली : समोसा, जिलेबी, लाडू म्हटल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पण हे पदार्थ सिगारेटइतकेच खतरनाक आहेत, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. ज्याप्रकारे सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचा इशारा छापलेला असतो, त्याचप्रकारे आता तेलकट आणि गोड पदार्थांच्या बाबतीतही संभावित धोक्याचं फलक केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सर्व कार्यालयांमधील उपहारगृहांमध्ये लावले जाणार आहेत.
याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पदार्थांमध्ये समोसे, वडापाव, कचोरी, पिझ्झा यांचा समावेश आहे. कार्यालयांमधील कँटीनमध्ये तेलकट, गोड सेवनासंदर्भात धोक्याचा इशारा लावण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व कार्यालयांना दिले आहेत.
माहितीनुसार आरोग्य मंत्रालयाने एक अहवाल तयार केला आहे.२०२५ पर्यंत देशातील ४४.९ कोटी लोक लठ्ठपणा किंवा जास्त वजनाने ग्रस्त असतील असं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत भारत अमेरिकेनंतर लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजणारा दुसरा देश बनेल.
म्हणूनच आरोग्य मंत्रालयाने अन्न आणि औषध प्रशासन (FSSAI) च्या सहकार्याने एक नवीन धोरण तयार केलं आहे, ज्या अंतर्गत या अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवर वॉर्निंग लेबल लावणं बंधनकारक केलं आहे. विशेष म्हणजे जंक फूडवर तंबाखूसारखे इशारे देण्याची तयारी पहिल्यांदाच केली जात आहे.
जंक फूडबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचललं आहे. जो सुरुवातीला सरकारी संस्थांमध्ये लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये सिगारेटप्रमाणेच तेल आणि साखरेचं प्रमाण दर्शवणारे बोर्ड आता लावले जातील.