मोठी बातमी! उज्वल निकम यांना राज्यसभेची लॉटरी, राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती…

नवी दिल्ली : ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आता संसदेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ॲड. उज्जवल निकम यांच्यासह चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे.

तसेच उज्वल निकम यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारीही मिळवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी देण्यात आली आहे.
उज्वल निकम यांचं नाव 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजलं. या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी काही महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून जबाबदारी पार पाडली. मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात त्यांनी सरकारी वकील म्हणून बाजू मांडली. दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब या दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात खटला चालला आणि त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी प्रकरणातही निकम सरकारी वकील होते. मात्र, आरोपींना कठोर शिक्षा न झाल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जाते. सध्या निकम हे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत