रिक्षातून प्रवास करताना विवाहित महिलेचा केला विनयभंग! लोणीकाळभोर पोलिसांनी एकाला केली तात्काळ अटक …

लोणी काळभोर : रिक्षातून प्रवास करताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सदर घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात मंगळवार (१ जुलै) रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी काही तासाच्या आत उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
याप्रकरणी २० वर्षिय पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून समीर शहाजहान मुकेरी (वय ३४, रा.कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला आपल्या मुलीला घेऊन त्यांच्या माहेरी चालल्या होत्या. हडपसर येथून रिक्षात बसल्या होत्या तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूला मुली तर डाव्या बाजूला दोन अनोळखी पुरुष बसले होते.
त्यातील एकजण समीर मुकेरी हा होता. रिक्षा लोणी स्टेशन येथे आली त्यावेळी मुकेरी याने महिलेच्या मांडी व कमरेला स्पर्श केला. त्यामुळे तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाली.त्यामुळे तिने रिक्षा चालकास रिक्षा तात्काळ थांबविण्यास सांगितली. तेव्हा मुकेरी तिच्या सोबत हुज्जत घालुन, तुला बघुन घेतो अशी धमकी देवुन त्या ठिकाणावरुन पळुन गेला. याप्रकरणी सदर महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुकेरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी समीर मुकेरी याला त्वरित अटक केली आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे,पूजा माळी, रुपाली जाधव, पोलीस अंमलदार कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.