काळजी घ्या!! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी…

पुणे : मुंबईसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लोकल सेवा, बस वाहतूक आणि रस्ते यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

तसेच मुंबईसह ठाणे, उपनगर आणि पश्चिम भागांत मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे. आकाशात गडद ढगांची दाटी असून, समुद्रात हायटाईडची स्थिती निर्माण झाली आहे.
अरबी समुद्रात दुपारी ३.३० ते ४.३० वाजेदरम्यान १४ फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता असून, नागरिकांना समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रात्रभर जोरदार पाऊस झाला असून, अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.

किनाऱ्यावर ४०–५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश असूनही काही मच्छीमार मासेमारी करत असल्याचे वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, मुंबईत मध्य व पश्चिम रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः सोमवारच्या सकाळी चाकरमान्यांना कार्यालय गाठताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
